प्रेस किट

देशी गोपालन – संकरीत गायी फरक

कोणताही व्यावसाईक जेव्हा देशी गोपालनाचा निर्णय घेतो तेव्हा त्याला उच्च उत्पादनक्षम गाई हव्या असतात. सर्वांच्या डोळ्यासमोर देशी गोपालनासाठी गीर, थारपारकर, साहिवाल आदी जातीच्या दुधाळ जाती असतात. प्रथमतः एक लक्षात घ्यायला हवे की या गाई दुधाळ व उच्च उत्पादनक्षम असल्या तरी संकरीत गायींप्रमाणे अगदी सहजगत्या या पशूपालकांकडे सापडत नाहीत. दुसरी बाब म्हणजे या गाई लगेचच १५ ते २० लिटरचा रिझल्ट दाखवत नाहीत. आपण पुढे काही तपशील या लेखात पाहणार आहोत. या गाईंची खरेदी करताना फार अगोदर पासून तयारी करावी लागते. या गाई जात्याच बुद्धीमान असल्याने आपण आणल्यापासून काही दिवस या गाई दूध देताना दंगा मस्ती करण्यापासून ते दुध न देण्यापर्यंतच्याही घटना घडतात. नविन व्यावसाईकाला अचानक निराशा येते. काही पुढे नवे करण्यापूर्वीच त्याला या सर्व व्यापातून मोकळे व्हावेसे वाटते. देशी गोपालन ही चिकाटीची गोष्ट आहे व या गोपालनात काही काळ संयम व धीरोदात्तपणा यांचा संगम करूनच व्यावसाईकाला पुढे जावे लागते.

             देशी गोपालन करणे म्हणजे काही दिव्य नव्हे. भारतात कोणे एके काळी व आजही महाराष्ट्रासह विविध राज्यात गावरान व त्या त्या भागातील देशी गाई हाताशी घेऊन गोपालक किंवा शेतकरी दुग्धव्यवसाय करीतच आहेत. या व्यवसायाचे स्वरूप फारच किरकोळ असते. गावातच वा परिसरात केला जातो हा व्यवसाय. मात्र जेव्हा पाच किंवा त्यापेक्षा जास्त गाई आणून हा व्यवसाय करायचा असतो तेव्हा खरी कसोटी सुरू होते. या विषयात कसोटी लागावी असे अनेक मुद्दे व बाजू आहेत. देशी गोपालन केवळ भारतीय प्रजाती वाचवण्यासाठी किंवा जैवविविधता व गाईंच्या जाती वाचवण्यासाठी कोणी करीत आहे का ? ब-याचदा याचे उत्तर नाही असेच असते. सर्व शेतकरी समूह किंवा गोपालकांचा व नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणा-या मंडळींचा ओढा काही निवडक जाती खरेदी करण्याकडे असतो. आम्हाला गीर, साहिवाल, कांकरेज, थारपारकर, राठी याच गाई हव्यात. अशी मागणी आल्यावर अंदाज येतो. आपणाला इथेच तोल सांभाळावा लागणार आहे.

             भारतातील झपाट्याने कमी होत चाललेले गोधन वाचवायचे असेल तर देशी गोपालन करून दुग्धव्यवसाय वाढवणे हा ठोस उपाय नव्हे. एटू दूध म्हणजेच काही विषारी बीटाकेसीन सारखे घटक नसलेले दूध. यामुळे बाजारातून या दूधाची मागणी वाढत आहे. भारतीय देशी गाईंचे दूध एटू दूध आहे हा शोध १९९३ सालीच लागला व पुढे २००७ साली त्यावर कर्नालच्या संशोधन संस्थेने शिक्कामोर्तब केले. या सर्व पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना व गोपालकांना लगेचच अमाप उत्साह येऊन देशी गाई खरेदी करून दुग्धव्यवसायात येण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय चांगलाच खोलवर रूजलेला आहे. तो या देशी गोपालनाच्या चळवळीतून नव्या वळणावर येणार असेल तर आनंदच आहे ! मात्र त्यासाठी संयम व चिकाटीची गरज आहे हे मात्र खासच.

Go Top