प्रेस किट

एटू दूध आणि देशी गोपालन – व्यवसायाला दिशा नवी.

श्री. गजानन पळसुलेदेसाई

               विषमुक्त अन्नाच्या चळवळीसह सेंद्रीय दूधाची चळवळ आज सर्वत्र जोर धरत आहे. भारतातच नव्हे विदेशातही कच्चे दूध ( raw milk ) किंवा नैसर्गिक दूध या नावाने हा ट्रेंड येतानाच भारतात एटू दूध ही चळवळ जोर धरू लागली. १९९३ साली न्यूझीलंड देशातील शास्त्रज्ञ बॉब इलियाट याने या विषयावरील संशोधन करून जगात खळबळ उडवून दिली. मात्र आज २०१४ सालीही त्याबाबतीत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. मात्र मॉल मधून ए.टू दूध ९०/- रू. ते १५०/- रू.  दराने विक्री सुरू झाली आणि अनेकांना ही नवी व्यवसाय संधी खुणावायला लागली. भारतीय अन्न व औषध प्रशासन खात्यानेही गाईंच्या दूधाच्या व चिकाच्या तसेच गोमूत्राच्या माध्यमातून तयार केलेल्या औषधांना मान्यता दिली. यातील काही औषधे आयुर्वेदिक वैद्यकांनी चांगलीच उचलून धरली. फार प्राचीन वेद काळापासून भारतीय गाय औषधांसाठी व गोमूत्रापासून बनविली जाणारी कीटकनाशके यासाठी मान्यता पावलेली आहेच. या पार्श्वभूमीवर देशी गोपालनाला गेल्या दहा वर्षांत अत्यंत चांगली प्रतिष्ठा मिळाली. आज सध्या महाराष्ट्रात मिळालेल्या माहितीनुसार चौदा देशी गाईंचे प्रकल्प लहान मोठ्या स्वरूपात उभे राहत आहेत. हे चांगल्या चळवळीचे लक्षण आहे.

            आरोग्यासाठी कच्चे दूध चांगले हा बदल पाश्चात्य देशात केवळ एका रात्रीत झालेला नाही. भारतात तर प्राचीन काळापासून लहान बाळ जन्माला आल्यावर त्याला गाईचेच दूध प्यायला देण्याची प्रथा वर्षांनुवर्षे आहे. दूधाची फॅट कमी आहे व ते पचायला हलके आहे म्हणून नव्हे तर त्यामागे काही आरोग्य विचार होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधारणतः याच विषयावर जागृती होताना १९९३ सालच्या बॉब इलियाटच्या एटू दूध या विषयावरील संशोधनानंतर सन २००७ साली म्हणजे बरोबर पंधरा वर्षांनी डॉ. किथ वूडफोर्ड यांचे " डेव्हील इन दी मिल्क " हे पुस्तक बाजारात आले. या पुस्तकाने जगभरात व अन्नक्षेत्रात खळबळ माजली. विकसीत देश आणि विकसनशील देश यांच्यात पशूधन व मानवी आरोग्यासाठी दूध यावर वेगवेगळ्या अंगानी चर्चा झडू लागल्या. या बौद्धिक मंथनातूनच भारतीय गाईंच्या म्हणजेच देशी गाईंच्या श्रेष्ठत्वाबाबतीत काही ठोस पुरावे हाती लागले.

           आज माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट होतो दररोज होतो आहे. वेगवेगळे शोध लागत आहेत. त्याप्रमाणात मानवी आरोग्याची काळजी घेतली जात आहे. शरीरात विविध रोगांचे बीजारोपण करणा-या बीटाकेसीन या विषावर संशोधन सुरू आहे. विषमुक्त अन्नाची चळवळ पर्यावरण संस्था, संघटना व काही व्यक्ती यांच्या माध्यमातून चालू आहे. नैसर्गिक व सेंद्रीय दूधाची मागणी या गेल्या पंधरा ते वीस वर्षातच वाढली हे विचारात घेण्यासारखे आहे. भारतीय दुग्धव्यावसाईकांना ही सुवर्णसंधी आहे.              

              बाजारपेठेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात हा मुद्दा नीटपणे येईल. उदा. मुंबई बाजारपेठेत राजस्थानातील गोशाळेचे दूध एटू दूध म्हणून येते. या दूधाच्या उपलब्धतेला मागणी व प्रतिक्षा यादीत ग्राहकाला आपले नाव ठेवावे लागते. मोठ्या व छोट्या शहरात आता नैसर्गिक व सेंद्रीय दूधाची चळवळ जोर धरू लागली आहे. कोणतीही प्रक्रिया न करता ( पाश्चरायझेशन व तत्सम ) दूध काढल्यावर पहिल्या चार तासांपूर्वी थेट ग्राहकाला देणे म्हणजे नैसर्गिक दूध. या प्रकारच्या दूधासाठी अजूनही काही गोष्टी विचारात घ्यावी लागतात. गाय किंवा म्हैस एकाच जागी बांधलेली नसावी ( स्टॉल फीडेड ) तर ती रानावनात फिरणारी, विविध प्रकारच्या वनस्पती खाऊन आलेली असावी.  तर गाय रानावनात फिरणारी हवी हा आयुर्वेदाचा आग्रह औषधी ग्रंथात आहेच. भारतीय म्हशीचे दूधही एटू दर्जाचेच असते. इतकेच कशाला बकरी, मेंढी, उंटीण, गाढवीण यांचे दूधही एटू दर्जाचेच असते. संशोधनांती हे सिद्ध झालेले आहे."डेव्हील इन दी मिल्क " या पुस्तकाने या सर्व गोष्टी जगातील शेतकरी वर्गासमोर आणल्या.

                  भारतीय गोवंश हा एटू असल्याचे केव्हाच सिद्ध झालेले आहे. भारतातील पर्यायाने महाराष्ट्रातील गोपालकांनी या एटू दुधाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रीया पार करून बाजारपेठ काबीज करायला सिद्ध होण्याची गरज आहे. प्रमाणीकरण आणि एवन व एटू म्हणजे काय ? आपण ही प्रमाणपत्रे कशी मिळवणार हा प्रश्न साहजिकच पडेल पशूपालकांना. या प्रश्नांची उत्तरे फारच सोपी आहेत. भारतातील सर्वच्या सर्व गोवंशाच्या प्रजाती या काही खास गुणवैशिष्ट्यांच्या आहेत. लांब केस असलेले शेपूट, मानेच्या खाली लोंबणारी पोवळी किंवा लोंबणारी त्वचा, टणक शिंगे व पायाचे खूर, पाठीवरील उंचवटा ज्याला सर्वसाधारणतः वशिंड म्हणतात. ( विविध भागात याला शब्द व ओळख वेगळी आहे. ) भारतातील गाई व म्हशी व अन्य दूध देणारे प्राणी ( जसे याक ) हे एटू या गटातील असल्याचे कर्नाल येथील शासकीय संशोधन केंद्राने २००९ साली अधिकृतपणे जाहिर केलेले आहे. सबब देशी गाईंच्या ३२ पैकी कोणत्याही जातीला प्रमाणपत्राची गरज नाही. म्हशीच्या दूधाची फॅट ६ च्या वर व ११ दरम्यान असते. जगभरात म्हशीच्या दूधाला विरोध होतो तो त्याच्यातील घनतेमुळे. गाय व म्हशीच्या दूधातील फरक ओळखण्यासाठी महाराष्ट्रात एकेकाळी हंस या चाचणीद्वारे परीक्षा करणारी केंद्रे उघडण्यात आली होती ते अनेकांना स्मरत असेलच.

                 आपणा सर्वांनाच नैसर्गिक दूध मिळणे अशक्य आहे. एका गावात किंवा साधारणतः शहराच्या आसपास असलेल्या गावांतून २५ ते ५० कि.मी. अंतरावर नैसर्गिक दूधाचा प्रसार करता येणे शक्य आहे. व्हॅनद्वारे ते पोहोच करता येईल. सेंद्रीय दूधाबाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. गाई वा म्हशींना धोकादायक ऑक्सीटोसीनसारखी संप्रेरके न देणे हे महत्त्वाचे आहे. रासायनिक दूध व केमीकलपासून बनविले जाणारे पांढ-या रंगाचे जीवघेणे दूध अनेक ठिकाणी पकडले गेले आहे. सेंद्रीय दूधात युरीया प्रक्रीया, चारा, पशूखाद्ये, बायपास खनिज मिश्रणे, आदी खाद्य याला मान्यता असते. मात्र या सर्वांना एम.आर.एल. म्हणजेच किमान पातळी ठरवून दिलेली आहे. यामुळेच नैसर्गिक दूध व सेंद्रीय दूध यातील फरक लक्षात घेतला तर दोन्ही प्रकारातील दुग्धव्यावसाईकांना आज विस्तारलेल्या बाजारात ग्राहकांना आरोग्यभान आलेले असताना संधी खुणावत आहेत. गरज आहे ती या सर्व प्रक्रियेकडे सकारात्मकतेने पाहण्याची. 

                        देशी गाई म्हणजेच  जागतिक निकषांनी व कर्नालच्या संशोधन केंद्राने ठरवून दिलेली सहा लक्षणे ज्या गाईंमध्ये आढळतात त्या भारतीय गाई होत. यात दूध राणी गीर, साहिवाल, थारपारकर याच्याशिवाय राठी, ओंगोल, डांगी, लाल कंधारी, कांकरेज, निमारी, अमृतमहल आदी सर्व गाई कोणत्याही देशी किंवा एटू सिद्धांताचे प्रमाणपत्र न घेता एटू दुधाची पूर्तता करणा-या आहेत. पशूपालकांनी आपला दुग्धव्यवसाय काळजीपूर्वक व ग्राहकाभिमुख केला तर आजची बाजारपेठ संधीची दारे उघडणारी आहे. देशी गाय दुधाचीच मिठाई बनविणारे श्री. गानू ( देवरूख ) किंवा बाजारात गायीच्या शेणाच्या गोव-या पाठविणारे गोपालक या बदलत्या बाजाराचे भान आलेले गोपालक म्हटले पाहिजेत. डेव्हील इन दी मिल्क ग्रंथाचे लेखक डॉ. किथ वूडफोर्ड यांनी आशावाद प्रकट केला आहे की येत्या पन्नास वर्षांत आपण ए१ मुक्त दूध ( म्हणजेच एटू दूध ) स्विकारणार आहोत. या बाजूवरूनच लक्षात येईल की आज बाजारपेठ ही शास्त्राधारीत सिद्धांतावर चालणार आहे. भावनात्मक आवाहने किंवा श्रद्धा व परंपरा यावर आधारलेली वचने गोपालकाच्या मदतीला येणार नाहीत तर वैज्ञानिक सत्य स्विकारूनच बाजारपेठ काबीज करावी लागेल.  

           महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय आज एका स्थित्यंतरातून प्रवास करीत आहे. दुधाचे दर नेहमीच खाली वर होत असतात. मात्र देशी गाईचे दूध पिणे या बाबीला आता स्टेटस येऊ लागले आहे. गुरूकुल पद्धत्तीच्या शाळा किंवा काही खासगी शाळा आपल्या निवासी शाळांतून मुलांना देशी गाईंचे आरोग्यदायी दूध प्यायला देतो अशा जाहिराती करू लागल्या आहेत. हे चांगल्या जनजागृतीचे लक्षण आहे. गाईचे दूध नको म्हणणारे लोक आता गोमूत्र अर्क प्यायला लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे. हा बदल एकाएकी झालेला नाही तर मधुमेह, हार्ट, कॅन्सर या आजारांचा विळखा ज्या वेगाने पडतो आहे त्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याबाबतीत जेव्हा चर्चा चालते तेव्हा देशी गाईचे दूध पिणे हा पहिला उपाय सर्वांच्या समोर येतो. दुग्धव्यावसायीकांना ही आपला व्यवसाय वाढविण्यासाठी संधी आहे.

(   लेखक देशी गोपालक असून गोसाक्षरता चळवळीत सक्रीय कार्यकर्ता आहे. ) 

Go Top