"अमृतमहल" गोवंश (म्हैसूर)

आपल्या भारतीय गोवंशापैकी ज्या गोवंशाचे ब्रिटीश सत्तेला सुद्धा मोहीत केले व संशोधनात्मक कार्यास भाग पाहले, असा अंगामध्ये प्रचड ताकद, विलक्षण चपळाई व कामामध्ये कमालीचे सातत्य असा त्रिवेरी गुणांचा संगम असलेला गोवंश म्हणजे "अमृतामहल" गोवंश होय.

या गोवंशाचे मुळ उत्पत्तीस्थान स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हैसूर संस्थान हे आहे. टिपू सुलतानाचे या गोवंशावर अपरंपार प्रेम होते, त्यांचे पदरी आदर्श अमृतमहल गोवंश अत्यंत प्रयत्नपूर्वक विकसीत केलेला होता. सन. १८६६ मध्ये ब्रिटीशांच्या नोंदी २१/२ दिवसांमध्ये १०० मैल अंतर वाहून नेल्याची विक्रमी नोंद दप्तरी आहे. त्याकाळात "मिलेटरी बैल' म्हणून या बैलांची ओळख परिचीत होती कारण सैन्याच्या तोफा वाहून नेणे, आरमाराचे अवजड सामान अडचणीचे जागी वाहून नेणे, लांबपल्याची वाहतूक कमीतकमी वेळात करणे. इ. कामे हे बैल करत असत.

गोवंशाची उपलब्धता

सध्या कर्नाटक राज्यामधील हसन, चिकमंगळूर, चित्रदुर्ग, तुमकर या प्रदेशामध्ये शेतकरी फक्त बैलांची निर्मिती ह्याच हेतूने मोठ्या प्रमाणावर गोवंश सांभाळतात. शारीरिक ठेवण या गोवंशाचे संपूर्णत: पांढरा ते संपूर्णत: काळसर छटा यामधील अनेक छटा आढळतात. ज्या गोवंशाचा रंग काळा किंवा काळसर छटेचा आहे. त्यांचा रगं उतार वयात फिका होत जातो. पण रंगामध्ये छटा विविध असल्या तरीही रंगाचे मिश्रण कधीही नसते. संपूर्ण जनावर एक रंगीच असते. या जनावरांची शिंगे उगमस्थानी अगदी लगत असून पुढे जनावरांची शिंगे उगमस्थानी अगदी लगत असून पुढे सरळ किंवा कोचर होतात, शिंगे कधीही जाडी नसतात, रंगाने काळी किंवा पांढरट गुलाबी रंगाची असतात. डोळे लांबट संपूर्णपणे काळे व कायम रोखलेले असतात, या जनावरांच्या मनाविरुद्ध जरा वर्तन झाले की डोळे लगेच इंगळी सारखे लाल करतात. कान लहानसर लांबट शेवटला टोकदार व आतील बाजूने पिवळसर असतात, कानांची ठेवण कायम टक्करालेली व जमिनीला संमातर असते. चेहरा लांबट निमुळता व आकर्षक असतो, नाकपुडी काळी व लहानसर असते आणि चेह-याला अत्यंत शोभणारी असते. मानेखालची पोळी (लोळी) लहानसर व घट्ट असते, मान लांबरुंद असते, ही जनावरे उंचनिंच व लांबडी असतात. खूर बहुतांशी काळे उंच व सलग असतात. पाय उंच व सरळ असतात, वशिड एकदम घट्ट व भरीव असते. कातडी शरिराशी एकदम घट्ट व पातळ असते. अंगावर एक प्रकारची विलक्षण चमक असते. या जनावरांमध्ये बेंबी कधीही दिसत नाही इतपत पोटाला घट्ट चिकटून असते. गायींमध्ये कास कधीही बाहेरुन दिसत नाही, चारही सड (आचळ) लहानसर व एकमेकांचे अगदी लगत असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा लहान व सरळ आणि अस्पष्ट असतात. या गोवंशातील बैलांचे मागचे चौक अगदी साचेबंद रेखीव उताराचे असतात. शेपूट लांबलचक असते, शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो.

या जातीचे बैल एकहाती जास्त होतात. त्यांना चार माणसांची सवय करणे अत्यंत गरजेचे आहे. हया बैलांचा विश्वास येण्यास बराच कालावधी लागतो पण एकदा खात्री झाली की विश्वासघात कमी होतो. अत्यंत तापट स्वभावाचे असतात.

या गोवंशातील कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय ३६ ते ४२ महिन्यापर्यंत असते. गायींमध्ये पहिल्या पाच वेतांमध्ये सलग दुग्धोत्पादन वाढीव असते. व्यायल्यानंतर दुधाच्या ऐनभरामध्ये दिवसाकाठी ४ लिटस पर्यंत दूध सहज देतात. वासरु गायी बरोबर मोकळे ठेवल्यास दोनदोन तासांनी सुद्धा संपूर्णपणे पान्हावून वासरांना दूध पाजतात. या जातीच्या खोंडाना वयाची ३ वर्षे पूर्ण झाली की हळूहळू शेतीची कामे शिकवण्यास व कायम थोडाथोडा वेळ धरण्यास सुरुवात करावे, खोंड दाती जुळवा की लगेच रक्त्यीकरण करावे म्हणजे अंगाने चांगला भरतो. या गायींचे दोन वेतांमधील अंतर १८ ते २४ महिन्यांचे असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडकाळ ६ ते ९ महिन्यांचे दरम्यान असतो.

पूर्ण वाढ झालेल्या जनावरांची मापे सर्वसाधारपणे पुढीलप्रमाणे असतात.

शरीराची लांबी उंची तीजवळील घेर

१. बैल १३० ते १३५ ते १८० ते १४० सें.मी १४० सें.मी १९० सें.मी.

२. गाय ११० ते ११५ ते १४४ ते १२० सें.मी १२० सें.मी. १५० सें.मी.

पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ४०० ते ४२५ कि.ग्रॅ. तर गायीचे वजन २७५ ते ३०० कि.ग्रॅ. असते.

हा गोवंश शेती व शर्यतीचे बैल म्हणून प्रामुख्याने उपयोगी असल्याने खोंडाना लहानपणापासून विशेष काळजीने वाढविले जाते. उत्तम अशा एका खोंडाची किंमत ५० हजारापासून १ लाखापर्यंत असते तर उत्तम गायीची किंमत ४० हजारापर्यंत सहज असते.