भारतीय "गोवंश-गोवत्स" संवर्धन – कृती आराखडा

( नवजीवन संस्थेचा १ एप्रिल २०११ ते २०१६ अखेर 'गोवंश-गोवत्स' संवर्धन –
'गोदान-स्विकार संस्कार' उपक्रमांचा पंचवार्षिक कृतीकार्यक्रम )

प्रास्ताविक : कोकणातील पशूधन कमालीचे घटते आहे. ज्या वेगाने शेतीचे यांत्रीकीकरण होते आहे तो भयावह वेग असाच वाढत राहिला तर गाय व बैल हे प्राणी भविष्यात वस्तुसंग्रहालयासाठीच राहतील ही काय अशी भिती वाटते. कत्तखान्यात जाणा-या जनावरांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पोलीसांकडून पकडले जाणारे दूक व टेम्पो त्याचेच दर्शक असतात. अशा पार्श्वभूमीवर चीनचा 'मु-हा', 'मेहसाणा' जाफराबादी, सुरती म्हशींवरचा वंशसंकर अभ्यास आपणाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भेसळयुक्त व रसायनमिश्रीत दूधच गोड मानून आपण कोकणवासियांनी पशूधनाकडे-गोवंशाकडे दुर्लक्ष केले तर भावी पिढ्या सोडाच निसर्ग अन् आपलं शरीरही आपणाला माफ करणार नाही.

'नवजीवन' संस्था गोवंशसंवर्धन गोवत्ससंवर्धन उपक्रम आयोजित करते म्हणजे नक्की काय? संस्थेच्या विविध भारतीय गोवंश संवर्धन उपक्रमांची, कृती आराखड्याची यथायोग्य माहिती व्हावी, संस्थेचा भविष्यकालीन आराखडा व कृतीकार्यक्रम कळवा यासाठी हा लेखप्रपंच!

"नवजीवन विकास सेवा संस्था" भारतीय गोवंशसंवर्धन गोवत्ससंवर्धन या उपक्रमांत सातत्याने कार्यरत आहे. कोकणातील गोधन वाढावे, कोकणात झालेला वंशसंकर कमी होऊन शुद्ध भारतीय वंशाच्या (जसे गीर, साहिवाल, गौकाऊ, लाल कंधारी, डांगी) गायींचे जतन व्हावे, शुद्ध भारतीय गोवंश वाढावा हा हेतू यामागे आहे. सध्या समाजात अध्यात्माप्रेम व आयुर्वेदप्रेम वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. सर्व पंथांच्या संतमहंतानी गोमातेला परमदैवत मानले आहे. आयुर्वेदाने गाय दूध, तूप, लोणी या अन्नाला सर्वोत्तम म्हणून मान्यता दिली आहे. या सर्वांचा विचार करून संस्थेने कोकणसाठी 'गीर' गाय संगोपनार्थ निवडली आहे.

नवजीवन उपक्रम

गीर गाय कार्यशाळा – या उपक्रमात संस्था दशकोशीसाठी किंवा पंचक्रोशीसाठी गोवंशपालन, गोपालन कार्यशाळा शेतक-यांसाठी आयोजित करते. यासाठी कमीत कमी २५ दुग्धव्यावसायीक किंवा शेतकरी, गाय खरेदी करू इच्छिणारे शेतकरी अपेक्षित असतात. गोपालन किंवा गोशाळा चालवणा-यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाते. डॉ. दयाराम सूर्यवंशी (ओमेगा लॅब लोणंद-फलटण) तसेच डॉ. हुसेन शेख ( देवरुख-रत्नागिरी) श्री. मिलींद देवल (पशूतज्ज्ञ-पुणे) यांचा यात सहभाग असतो. एल.सी.डी. सहित ध्वनीचित्रफीत दाखवत ही कार्यशाळा एकदिवसीय असते व्याख्यान प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरे असे कार्यशाळेचे स्वरुप असते. ( लांजा जि. रत्नागिरी येथे २१ ऑगस्ट २०१० रोजी २४३ शेतक-यांसह राज्यस्तरांवर, सिंधुभूमी फाऊंडेशनतर्फे २१ डिसेंबर रोजी कासार्डे जि. सिंधुदुर्ग येते ७० शेतक-यांसह २ कार्यशाळा संपन्न)

गोविज्ञान-गो-साक्षरता व्याख्यान

संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. गजानन पळसुलेदेसाई गोसाक्षरता अभियान मोहिम चालवतात. गोवंशाची माहिती, भारतीय गोवंशाची वैविध्यता, गोविज्ञान आणि गोवंशाधारीत उत्पादने आणि शेतक-यांचा कृतीकार्यक्रम तसेच व्यक्ती म्हणून ती काय करु शकतो याबाबतीत प्रबोधन करणारे व्याख्यान देतात. १ ते २ तासाच्या मंत्रमुग्ध करणा-या या व्याख्यानातून गोविज्ञान प्रचार, प्रसार, गोवंश साक्षरता साधली जाते. (यावर्षी ३ नोव्हेंबर २०१० रोजी फलटण- येथे उपळेकर महाराज मठात उपक्रमाला सुरुवात झाली. आजवर ७ व्याख्याने आकाशवाणी-रत्नागिरी सह झाली आहेत.

पशूचिकित्सा शिबिर – गोवंशाचे निदान, रोजनिवारण आणि गर्भनिश्चिती यासाठी पशूचिकित्सा-गोवंश उपचार शिबीर घेतले जाते. तज्ज्ञ मार्गदर्शक पशूवैद्यक उपस्थित पालकांना प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतात. ( आजवर अशी ३ शिबीरे झाली.)

गोदान संस्कार स्विकार मंगल सोहळा

संस्था स्वत:ची 'गोशाळा' नवजीवन गोशाळा निर्माण करीत आहे पवित्र व सर्वश्रेष्ठ दान 'गोदान' संस्था स्विकारते. आपणाला या पुस्तिकेत सविस्तर माहिती आलेली आहेच. या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत, कार्यक्रम वृत्तांत या माहिती पुस्तिकेत ठेवला आहे. आपल्या वाचनात ही माहिती आल्यावर आपणाला स्वत:ला किंवा अन्य कुणाला गोदान करायचे असल्यास संपर्क साधावा. संपर्क – श्री. गजानन लक्ष्मण पळसुलेदेसाई संवादध्वनी – ९४२००५५२६८ किंवा ९२२२७२८३०९ किंवा ९४२२९१२७३१

"गाय बैल-सौंदर्य स्पर्धा"

शेतकरी आणि गोवालकांसाठी संस्थेतर्फे सुंदर-स्वच्छ गाय, देखणा, स्वच्छ बैल-वळू स्पर्धा घेण्याचे 'कृती-आराखडा' सभेत ठरवण्यात आले. दत्तजयंती, वसुबारस (गोवत्सद्वादशी) यासारख्या दिवशी अशी स्पर्धा व्हावी घेण्यात यावी अशी संकल्पना आहे. यावर्षी रिंगणे या गावी ही स्पर्धा १८ जनावरांच्या सहभागासह संपन्न झाली. जि.प. पशुसंवर्धन विभाग रत्नागिरी यांचा हा या स्पर्धेच्या परिक्षणात व प्रमाणपत्र वितरणात सहभाग होता. येत्या ५ वर्षात अशा स्पर्धा गावोगावी घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

गोवंशसंवर्धन-भविष्यकालीन कृतीकार्यक्रम

"नवजीवन गोशाळा:- संस्था स्वत:च्या कार्यक्षेत्रात, कार्यालयाच्या कक्षेत सुसज्ज गोशाळा उभारणार आहे. कोकणातील हवामानात (उष्ण-दमट २०C से ते ४०C से दरम्यान) तग धरणा-या भारतीय गोवंशातील शुद्ध गोवंश आणून त्यांचे जतन, पालनपोषण, संगोपन संस्था गोशाळेत करील. या गोशाळेच्या माध्यमातून गो-साक्षरता अभियान, खिलार पैदास केंद्र, पैदासकार कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्था आयोजित करील. संस्थेने 'गीर गाय' गोकुळाष्टमी' या शुभदिवशी आणून गोशाळेची पायाभरणी केली आहे. ज्या भारतीय नागरिकांना गोशाळेसाठी 'गोदान' करायचे आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा ही विनंती.

वंशसुधार (ब्रिडींग पॉलीसी)

स्थानिक किंवा आपल्या गोठ्यात, दारी असलेल्या गायीपासूनच ३-या पिढीत १००% शुद्ध गोवंश पैदास करायचा असे धोरण संस्थेने आखले आहे. विद्यमान व आहे त्या गोवंशापासून उत्तम गोवंशनिर्मिती हे एकमेव लक्ष ठेऊन संस्था दत्तक गावात कार्यरत राहिल. यासाठी ग्रामपंचायत, देऊळ याठिकाणी, शाळेतील पालकसभेत व्हीसीडी, डीव्हीडी दाखविण्यात येतील. माहितीपट व प्रबोधनपर कार्यक्रमातून 'वंशसुधार' मोहिमेसाठी गावे दत्तक घेण्यात येतील.

प्रबोधनमाला-जनजागृती (अ) वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून गोवंशाची माहिती होईल असे जागृतीपर लेख, जनमानसांत इर्ष्या जागृत करणारे लेख प्रकाशित करण्यात येतील. दूरदर्शन व इतर वाहिन्यांवर गोवंशविषयक पशूप्रदर्शनाबाबत, आयोजित मेळावे याबाबत कार्यक्रम प्रसारीत केले जातील.

(ब) आदर्श गोशाळा (उदा. जसे अहिंसातीर्थ, यशोदानंद-धुळे) बेटी व सहली यांचे आयोजन केले जाईल. (क) महिला बचतगट, प्रगतीशील शेतकरी यांना (दुग्धव्यावसायिकांना सिद्ध गोवंशाच्या पालनासाठी प्रवृत्त केले जाईल. गावागावात घरोघरी एक गाय असलीच पाहिजे अशी शेतकरी वर्गाकडून शपथच घेतली जाईल अशी आखणी कृतीकार्यक्रमाची होईल.)

(ड) गावातील उत्पादनकेंद्रासाठी मार्गदर्शन केले जाईल.

ग्रामदत्तक योजना – एखाद्या निवडक व सक्षम गावाला यासाठी दत्तक घेतले जाणार आहे. (सध्या मु.पो.आसगे ता.लांजा) दत्तक गावात खालील उपक्रम मान्यवर, तज्ज्ञ पशवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील.

  1. पशूगणना- आदर्श पद्धतीने पशूगणना केली जाईल. त्यात विविध नोंदी काळजीपूर्वक, बारकाईने केल्या जातील.
  2. जनमानसाचे परिपूर्ण प्रशिक्षण प्रकल्पकालात केले जाईल.
  3. निकृष्ट वळूंचे खच्चीकरण (निर्बीजीकरण) शेतक-यांना विश्वासात घेऊन, त्यांना मार्गदर्शन करुन केले जाईल.
  4. गावातील पशूधनाच्या अचूक व तपशिलवार नोंदी जसे संकर, गर्भधारणा निश्चिती, तपासणी ठेवल्या जातील.
  5. जनावरांची परिपूर्ण जन्मनोंद ठेवली जाईल.
  6. जन्मलेल्या वारसाचे लसीकरण करून परिपूरण संगोपनासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
  7. गो पालकांना कृत्रिम रेतनाचा लाभ त्यांच्या गोधनासाठी दिला जाईल.
  8. इच्छुक गो पालकांना १.५ वर्षाच्या सशक्त कालवडी वितरीत केल्या जाती. दुधाळ गोवंश वाढेल असे प्रयत्न यात असतील.
गोवंशाधारीत उत्पादने विक्री केंद्रे स्थापना

समाजातील विविध मध्यमवर्गिय उच्चभ्रू तसेच सर्वसाधारण ग्राहकवर्ग याचेसाठी बाजारातील मध्यवर्ती प्रसिद्ध दुकाने, सुपर-मार्केट येथे गोवंशाधारित आयुर्वेदीय उत्पादने विक्रीसाठी ठेवली जातील. गोमय शांपू, तूप, लोणी, गोमूत्र अर्क आदी उत्पादने टप्प्याटप्प्याने संस्था ग्राहकवर्ग हेरून स्वत:च्याच कार्यक्रमांतून विक्री करील. ग्राहकपेठ, मेळावे कन्झ्युमर्स शॉपी आदी मोठमोठ्या मेळाव्यांतून अशा उत्पादनांचे मार्केटींग संस्था करण्याचा प्रयत्न करील. आवश्यक तेथे संस्था स्वत: (दुस-यांशी समेंट करून पुरवठादार बनेल. गोवंशाधारीत वस्तूंबाबत जागृती करून समाजात या वस्तूंचा आयुर्वेदीय दृष्टीकोनातून वापर होईल यासाठी संस्था प्रयत्नशील राहिल.

समारोप-आवाहन –

नवजीवन विकास सेवा संस्थेच्या चालू आणि नियोजित उपक्रमांबद्दल या ठिकाणी विवेचन केले आहे. आपणा सर्व गोवंश पालकांना आणि गोवंशप्रेमींना आवाहन आणि विनंती आहे की आपणाला जर या कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आमच्या संस्थेशी संपर्क साधावा. कोकणातील गोवंशाची व्यथा आपण एका यशोगाथेत बदलू शकतो. कोकणातीलच नव्हे या कृतीआराखड्यातून कोणत्याही विभागाचा गोवंशसुधार कृतीआराखडा थोड्याबहुत फरकाने असाच बनू शकतो. आपणाला आपल्या पातळीवर, आपल्या गावाचा यात समावेश करायचा असल्यास यावे, आमच्यासह वाटचाल सुरु करावी हा नम्र विनंती.