"खिल्लारी" गोवंश (महाराष्ट्र)

आपल्या भारतीय गोवंशामध्ये अत्यंत चपळ, अत्यंत काटक व अत्यंत देखणा तसाच सर्वात जास्त किमतीचा गोवंश म्हणजे "खिल्लार" गोवंश होय. या गोवंशाला 'पांढरे सोने' संबोधणे हेच उचीत ठरते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी सर्वत्र तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण व पुर्वेकडील भाग तसेच कोकण व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात हा गोवंश वापरला जातो.

आपल्या महाराष्ट्राच्या लगतच्या कर्नाटकातील सीमा भागत व गोवंशाची मोठ्या प्रमाणावर पैदास केली जाते. (या गोवंशाच्या भौगोलिक रचनेनुसार काही पोटजाती निर्माण झाल्या आहेत. उदा. माणदेशी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार, पंढरपूरी खिल्लार, नकली खिल्लार अशा आहेत.

शारीरिक ठेवण

शिंगाचा रंग सफेद गुलाबी किंवा काळसर, शिंगे कोचर किंवा सरळ, कर्नाटक खिल्लार मध्ये शिंगे कपाळमाथ्या जवळ एकदम लगत व चिंचकुळी सरळ तर माणदेशी खिल्लार मध्ये जाडजूड व दोन शिंगांमध्ये योग्य अंतर असते.

नाकपुडी लालसर गुलाबी किवा काळ्या रंगाची असते, डोळे काळे व लांबट आकाराचे असतात, कान चेह-याचे मनाने लहान व शेवटला टोक असते, मान लांब व रुंद असते. पाठी पोटात आपरेपणा नसतो, मानेखाली पोळी (लोळी) मोठी नसते, गायींमध्ये बेंबीच्या येथील जागा अत्यंत अस्पष्ट असते, माणदेशी खिल्लार बैलांचे वशिंड मोठे व घट्ट असते, कातडी शरिरालगत घट्ट असते, केस अत्यंत लहान असतात, कातडीचा स्पर्श मुलायम असतो शेपूट लांबलचक सापासारखे असते, शेपुटगोंडा काळा व झुपकेदार असतो, बैलांमध्ये अंडकोष मध्यम आकाराचे व आटोपशीर असतात. गायींमध्ये निरणाची ठेवण आटोपशीर व लहानसर असते, गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा या लहान व अस्पष्ट असतात. कास आटोपशीर व लहान असते. चारही सड लगत व समान उंचीचे असतात, या गोवंशाचा रंग प्रामुख्याने चमकदार पांढरा असतो, म्हैसूरी खिल्लार आणि नकली खिल्लार यांचे मध्ये रंग काही वेळा कोसा किंवा जांभळट कोसा छटेचा येतो.

पूर्ण वाढ झालेल्या गायी व बैलांची मापे पुढील प्रमाणे असतात.

शरीराची लांबी उंची छातीजवळील घेर.

१. बैल १४० ते १५० सें.मी. १३५ ते १४५ से.मी. २०० ते २१० सें.मी २. गाय १२० ते १३० सें.मी १२५ ते १३५ सें.मी. १५० ते १६० सें.मी..

या गायींचे प्रथम वेताचे वय ४० ते ५० महिन्यांचे दरम्यान असते, दोन वेतांमधील अंतर १८ ते २४ महिन्यापर्यंत असते, एका वेतामध्ये सलग ८ ते १० महिन्यांपर्यंत दूध देतात. व्यायल्यानंतर दिवसाकाठी ३ ते ४ लिटर दूध देतात. वासरु दिवसभर गायीबरोबर मोकळे असल्यास या गायी ५ ते ६ वेळा चांगल्या पान्हवतात व दूध पाजतात. या गायींचा माजाचा कालावधी ६ ते ८ तासांचा असतो..

या गोवंशाचे बैल शेतीकामासाठी व ओढकामासाठी ताकदवान असल्याने प्रसिद्ध आहेत; तसेच शर्यतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. वयाच्या ३ ते ६ वर्षापर्यंत शर्यतीसाठी व हलक्या कामासाठी धरतात. बैल दाती जुळला की लगेच रक्त्यीकरण करावे म्हणजे अंगात भरतो देखील चांगला. मारकेपणा कमी होतो व मोठ्या कामांना धरता येतो..

या जातीचे बैल तापट स्वभाव व मारकेपणाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत तरी बैलांजवळ कधीही बेसावधपणा व फाजील आत्मविश्वासाने वावरु नये कारण हे बैल माणसांचा व जनावरांचा डुख (राग) धरतात त्यामुळे कधी मारतील ह्याचा नेम नसतो. या तापटपणा मुळेच काम रागारागाने झटपट करतात. या गायींची किंमत अंदाजे ३० ते ४० हजारापर्यंत असेत तसेच चारदाती खोंडाची किंमत ६० ते ७५ हजारापर्यंत आहे व नवथर बढीव बैलाची किंमत रु ४० हजारापर्यंत सहज असते. या गोवंशाच्य खरेदी विक्रीसाठी पुढील बाजार प्रसिद्ध आहेत. पुणे, जिल्ह्यातील चाकण, सांगली जिल्ह्यामधील खरसुंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, सातारा जिल्ह्यामधील सर्व महत्त्वाच्या देवांच्या यात्रा, सोलापूर जिल्ह्यातील सिद्वेश्वराची यात्रा विशेष प्रसिद्ध आहेत..

हा गोवंश अनेक गुणांनी परीपूर्ण असल्याने ग्रामीण लेखकांनी, कवींनी तसेच ग्रामीण चित्रपटांमध्ये ही कौतुक केलेला असा गोवंश आहे. काहीह झाले तरी चालेल एकदा तरी दारात खिल्लार जोडी असावी हे प्रत्येक शेतक-याचे एक स्वप्न असते..

वळूसाठी आवश्यक गुण –
  1. 1.खुर काळे व सलग पाहीजेत
  2. 2.शिंगे कोचर किवा सरळ
  3. 3.वळूपासून नर वासरांचे प्रमाण अधिक आवश्यक
  4. 4.शांत व सुस्वभावी स्वभाव आवश्यक
  5. 5.लाब पौंडी असणे गरजेचे
  6. 6.कातडी पातळ व चमकदार तसेच रंग दुधासारखा पांढरा असायलाच हवा.