"थारपरकर" गोवंश (राजस्थान)

आपल्या भारतीय गोवंशामधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गोवंश आहेत त्यामध्ये गुणवत्तेनुसार अग्रभागी असलेला गोवंश म्हणजे "थारपारकर' गोवंश होय. या गोवंशाला कमी पावसाच्या प्रदेशात सातत्याने येणा-या दुष्काळ सदृश परिस्थितीशी सामना करुन तग धरून राहण्याचे असे निसर्गाचे प्रचंड वरदान लाभलेले आहे.

गोवंशाची उपलब्धता

या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान दक्षिण सिंध (सध्या पाकिस्तान) येथील 'थारपारकर' या जिल्ह्यामधील आहे. त्यवरुनच या गोवंशाला "थारपारकर" असे नाव नोदणीकृत झाले. सध्या आपल्या देशामध्ये पाकसीमेजवळील राजस्थानचा भाग; या पश्चिमी भागापासून ते थेट गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत हा गोवंश मोठ्या प्रमाणात सांभाळला जातो व विक्रीसाठी उपलब्ध असतो. राजस्थान व गुजराथ मधील गोशाळांमध्ये हा गोवंश अतिशय चांगल्याप्रकारे अभ्यासपूर्वक जोपासला जात आहे.

शारीरिक ठेवण

या गोवंशाचा रंग चंदेरी पांढरा ते करडा (राखाडी) यांमधील विविध छटांमध्ये आढळतो. जन्मत: वासरे संपूर्णपणे करड्या रंगाची असतात परंतु जसे वय वाढत जाते तसा रंग बदलतो व कायमचा निश्चित होतो. सर्वसामान्यपणे या गोवंशाच्या गायी मध्यम बांध्याच्या असतात; शरिराची ठेवण आटोपशीर असते. शिंगे अगदी लहानसर काळी किंवा गुलबट पांढरी असतात, शिंगे बहुतांशी पाळीमागे झुकलेली किंवा जागेवरच कललेली असतात. शिंगाच्या जागची चेह-याची ठेवण दोन्ही आखांचे बाजुला उतरती असते. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये चेह-यावर किंचीत उभा खड्डा असतो. डोळे काळेभोर शांत व वात्सल्यपूर्ण असतात. नाकपुडी संपूर्णपणे काळी फक्त तोंडाच्या जवळ किंचीत गुलाबी असते. कान मध्यम आकाराचे आतून लालसर छोटेसे असतात. मान शरीराच्या मानाने थोडी आखूड असते; माने खालची पोळी (लोळी) आखीव रेखीव असते. गायींमध्ये कास मोठी व गोलाकार कळशी सारखी असते, कास बेंबीपासून सुरु होते, चारही सड (आचळ) गुलाबी रंगाचे व मध्यम आकाराचे असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दूधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट, मोठ्या व नागमोडी असतात. मागचे चौक प्रमाणबद्ध उताराचे असतात. खूर काळे उंच व टणक असतात. शेपूट पायापर्यंत येणारी असते व शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो.

पूर्ण वाढ झालेल्या बैलांमध्ये मानेच्या अर्ध्यांभागापासून ते वशिंडा पर्यंतचा रंग काळसर गडद छटेचा असतो, चेहरा लांबट निमुळता असतो, नाकपुडी संपूर्णपणे काळी असते, पुढच्या ढोपराच्या जागचे केस काळ्या गडद छटेचे असतात, खुर काळे उंच टणक असतात, मागच्या मांड्या व पुठ्ठे गोलाकार असतात, बैलामध्ये कातडी जरा जाडसर असते व बैल वेसीला किंचीत जड असतात.

पूर्ण वाढ झालेल्या उत्तम तयारीच्या बैलाचे वजन ४७५ ते ५०० कि. ग्रॅ पर्यंत असते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम गायीचे वजन ३७५ ते ४०० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते.

आकारमान लांबी शरीराची उंची छातीजवळील घेर

१. बैल १३५ ते १४५ सें. मी १३० ते १३५ सें.मी. १८० ते १८५ सें. मी.

२. गाय १२५ ते १३० से.मी. १२५ ते १३० सें.मी. १७० ते १७५ सें.मी.

या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय ३२ ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतापासून चौथ्यावेतापर्यंत दुग्धोत्पादनामध्ये सातत्याने लक्षणीय वाढ दिसते. प्रथम वेतामध्ये दिवसाकाठी सर्वसामान्य मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. दोन वेतांमधील अंतर १५ ते २० महिन्यांचे दरम्यान असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडाकाळ ४ ते ७ महिन्यांचा सहज असू शकतो. दुधाला सरासरी फॅट ४ ते ५ दरम्यान लागते.

स्वातंत्र्यपूर्व काळात या गोवंशावर संशोधनात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर चालू होते. सन १९३७ ते १९३८ या काळात कर्नाळ येथे झालेल्या अभ्यासानुसार एका गायीचे एक वेतामधील २८४ दिवसांमधील दूध उत्पादन ४७१९ पौंड भरले होते. या उत्तम गुणवत्तेमुळेच संपूर्ण भारतभर शेती महाविद्यालये, सरकारी फार्म, मिलेटरी डेअरी फार्म यांमध्ये मुळचा गोवंश म्हणून "थारपारकर" या गोवंशाची निवड करण्यात आली होती.