आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक व ठाणे ह्या जिल्ह्यांतील पर्वतरांगामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो व पर्जन्यकाळ हा जास्त कालावधीचा आहे अशा ठिकाणी शेतीमधील काम समर्थपणे करणारा गोवंश म्हणजे "डांगी" गोवंश होय.
आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कवळण व या जिल्ह्यातील पश्चिमेकडील प्रदेश; तसेच ठाणे जिलह्यातील पुर्वेकडील तालुक्यांमध्ये आणि अहमदनगर जिलह्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्यांचे जवळील प्रदेशामध्ये हा गोवंश चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.
स्थानिक निसर्गाशी जुळवून घेणारा वंश असल्याने हा गोवंश लहानसर हे मध्यम ठेवणीचा आहे. ह्या गोवंशाच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो ह्यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही हे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान या गोवंशाला प्राप्त आहे. हा गोवंश काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पांढ-या रंगावर काळे ठिपके अशा संमीश्र रंगाचा असतो. ह्या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत सहा प्रकारे संबोधला जातो १) काळाबाळा २) पांढराबाळा ३) मणेरी ४) लालबाळा ५) लाला ६) बाळा. भाद्रपद महिन्यातील माजरीचारा खाऊन जनावरे पुष्ठ झाली की अतिशय विलक्षण चमक या गोवंशाला प्राप्त होते. नजरेत भरेल अशी आकर्षक कपाळाची ठेवण असते, कपाळामध्ये अगदी मधोमध लहानसर उंचवटा असतो, शिंगे लहान दंडगोलाकृती किंचीत मागे झुकलेली व संपूर्णपणे काळ्या रंगाची असतात, नाकपुडे संपुर्णत: काळी व मध्यभागी फुगीर असते, खांदे भक्कम असतात, वशिंड लहानसर आकाराचे पण घट्ट असते, पाय उंचीने जरा लहानसर असतात, खूप एकसंघ लहान परंतु अत्यंत टणक व संपुर्णत: काळे असतात ह्या गुणामुळेच उंच डोंगरांमध्ये अवघडजागी जाऊन चरणे ह्या गोवंशाला सहज शक्य होते. कान लांबट गोलाकार असतात, डोळे गोटीसारखे चकचकीत असतात, कास लहानसर व गोलाकार असते आणि बहुतांशी कास पांढ-या रंगाची व चारही सड (आचळ) काळ्या रंगाचे लहानसर असतात, छाती कडून कासेकडे येणारी दूधाची शिर लहान आकाराची व सरळ असते, शेपूट सर्वसाधारण उंचीची गोंडा काळा झुपकेदार असतो, बैलांचे चौक उंचीला शोभतील असे रेखीव उताराचे असतात, या बैलांच्या अंगामध्ये शेतीकामाची विलक्षण चिकाटी व ताकद असते त्यामुळे सलग ५ ते ६ तास सुद्धा अडचणीच्या उताराच्या खाचरांमध्ये उखळणी व चिखलणीची कामे सहज करतात.
या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय सर्वसाधारणपणे ३६ ते ४४ महिन्यांचे असते. विशेष मेहनत घेतलेल्या कालवडी ३० ते ३२ महिन्यांच्या माजावर येऊन गाभण राहिल्याच्या गोशाळांमध्ये नोंदी आहेत. या गायींचे दोन वेतांमधील अंतर २० ते २४ महिन्यांपर्यंत आहे; तसेच संपूर्णत: भाकडकाळ ९ ते १० महिन्यांच्या सुद्धा असू शकतो. या गोवंशाच्या गायी उत्तमप्रकारे चरून आल्यावर नगदी खाणे ( पेंड, भूस इ.) नसले तरीही दिवसाकाळी ३ ते ४ लिटर दूध सहज देतात. या गायींच्या दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण ३ ते ३.५% पर्यंत असते. या गोवंशापासून संकर केलेल्या जर्सी/होल्स्टीन ५०% पर्यंतच्या कालवडी उत्तम गुणवत्तेच्या व दुधाळ सिद्ध झाल्या आहेत तसेच ५०% संकरीत खोंडे सुद्धा शेतीकामात उत्तम काम करतात. वयाची ४ वर्षे पूर्ण झाली की खोंडे शेतीकामासाटी योग्य ठरतात. या गोवंशाचे बैल एकजागी उत्तम जपणुकीवर १५ ते १६ वर्षे उत्तम काम करतात तसेच गायींची उत्तम मेहनतीवर ८ ते १० वेमी सहज होतात.
या गोवंशावर नाशिक व ठाणे जिल्ह्यांमध्ये सरकारी गोशाळा किंवा खाजगी गोशाळांमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने संशोधनात्मक प्रयत्न चालू आहेत. "डांगी" गोवंश हा सह्याद्री पर्वतरांगामधील शेतक-यांचेसाठी वरदान ठरलेला असा गोवंश आहे.
(संकलक : किशोर शहा )