आपल्या भारतीय गोवंशामधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गोवंश आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे "देवणी" गोवंश आहे. ह्या गोवंशाला "मराठवाडा भुषण" अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा असा हा गोवंश आहे
सुमारे २०० वर्षापूर्वी डांगी व गिर गोवंशाच्या संकरामधून मराठवाड्यात हा 'देवणी' गोवंश उदयास आला. आपल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे तसेच मोठ्या प्रमाणांवर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बिड या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खास हौशीने विक्रीसाठी पैदास करणारे शेतकरी आहेत.
या गोवंशाच्या गायी मध्यम आकाराच्या व आपोटशीर बांधण्याच्या असतात. गायींच्या मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे पट्टे (ठिपके) येतात. गायींच्या कातडीला विलक्षण अशी देखणी चमक असते; त्वचा अत्यंत मऊ असते आणि कातडी शारीराला घट्ट चिकटलेली असते. या गोवंशाच्या कपाळाची ठेवण भरदार व नजरेत भरणारी असते, शिंगे मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात, शिंगाचा रंग काळा असतो, डोळे लांबट व अंडाकृती असतात, पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात. बैलांच्या नजरेत जरब असते व कायम रोखून बघण्याची सवय असते. कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात, नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर असते, वशिंड पिळदार घट्ट परंतु शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते. मानेखालची पोळी (लोळी) शरीराला शोभेल अशी असते, मान लांब व रुंद असते, बैल लांब पौंडी असतात, मागचे पाय शरीराच्या मानाने किंचित उंच असतात व मांड्या पुष्टदार असतात, पाठ मागच्या बाजूने वशिंडाकेड किंचीत उतरती असते त्यामुळे शोभा येते, खूर संपूर्णत: काळे, एकमेकांशी सलग व भक्कम असतात त्यामुळे हे बैल कमी उगाळतात व नालबंदाचा खर्च आपोआप कमी होतो, शेपूट मागच्या ढोपरा पर्यंत येणारी व शेपूट गोंडा काळा किंवा पांढरा झुपकेदार असतो, गायींमध्ये कास कासंडीसारखी गोलकार व शरीराबाहेर जास्त न येणारी असते, चारही सड (स्तन) गोलाकार व बहुतांशी काळ्या रंगाचे असतात. या गोवंशाची उभे राहण्याची पद्धत विलक्षण ऐटबाज असते. हा गोवंश शांत व सुस्वभावी असतो. स्थानिक शेतकरी ज्या बैलांचा चेहरा संपूर्णत: काळा आहे त्याला "काळतोंड्या" व ज्याचे चेह-यावर कळा पांढरा मिश्र रंग आहे त्याला "वानरतोंड्या" म्हणून उल्लेखतात.
या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याची वय सर्वसाधारणपणे ३० ते ३५ महिन्यांपर्यंत असते. परंतु उत्तम मेहनतीवर २४ ते २७ महिन्यांपर्यंत माजावर येऊन गाभण राहिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. ऐन दुधाच्या भरात दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध सहज देतात, दूध सलगपणे विनातक्रार अंत १८ ते २१ महिने देतात. या गायींचे दोन वेतांमधील अंतर १८ ते २१ महिन्यांचे असते; दोन वेतांमधील भाकडकाळ हा ४ ते ६ महिन्यांचा असू शकतो. दुधाला सरासरी फॅट ३.५ ते ४.५ लागते.
या जाती्या बैलांना मराठवाड्यामधील तीव्र उन्हामध्ये सुद्धा काम करण्याची प्रचंड शक्ती ही निसर्गाची मोठी देणगी आहे. तीन वर्षे पूर्ण झालेली खोंडे शेतीकामात हलक्या कामासाठी वापरण्यास सुरुवात करतात. खोंड संपूर्णत: दाती जुळला की खच्चीकरण करावे. एकजागी उत्तमरीत्या सांभाळलेले बैल २० ते २२ वर्षांपर्यंत सहज काम करतात. या जातीचे बैल क्कचीतच मारके निघतात. पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन ३५० ते ४५० कि.ग्रॅ. पर्यंत असू शकते तर पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ५०० ते ६०० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते. पूर्ण वाढ झालेल्या गोवंशाचे आकारमान साधारणत: पुढील प्रमाणे असते.
(संकलक : किशोर शहा )
शरीराची उंची छातीजवळील
लांबी घेर
गाय १२० सें.मी. १२५ सें.मी. १५० सें.मी. बैल १३५ सेंमी. १४० सें.मी. १८० सें.मी.
या जातीचा उत्तम बैल जोडीची किंमत रु. १.५० लाखापर्यंत तर चांगल्या गायीची किंमत रु. ३५ ते ४० हजारापर्यंत असते.
संशोधनात्मक कार्य लाईव्ह स्टॉक रिसर्च अँड इनफरमेशन सेंटर ( देवणी), मु.पो. करंजा – हल्लीखेड बिदर सरकारी डेअरी फार्म – उदगीर ( संकलक : मिलिंद देवल)