"कांकरेज" गोवंश (गुजरात)

भारतीय गोवंशामधील प्रथम बघताचक्षणी प्रेमात पडावे असा लोभस गोवंश म्हणजे "कांकरेज गोवंश" होय. ह्या गोवंशाने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांना सुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेला गोवंश म्हणून ह्या गोवंशाची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊन देखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणे हे या गोवंशाचे प्रमुख वैशिष्टय आहे.

गोवंशाचे उत्पत्ती स्थान

आपल्या भारतामध्ये कच्छ च्या रणाच्या दक्षिण भागात म्हणजेच पुर्वेकडील देशापासून ते पश्चिमेकडील राधानूपूर जिल्ह्यापर्यंत हा गोवंश उत्तम पद्धतीने सांभाळला जातो व दरवर्षी उत्तम जनावरे माघ महिन्यापासून चैत्र पौर्णिमे पर्यंत विक्रिसाठी उपलब्ध असतात. बानस आणि सरस्वती या दोन नद्यांचे खो-यामधील भागामध्ये सुद्धा हा गोवंश उत्तम पद्धतीने जोपासला जातो; हा प्रदेश या गोवंशाजे मुळ उगमस्थान आहे. असे जुने जाणकार सांगतात, त्याच प्रमाणे काठेवाड, बरोडा, सुरत या भागात सुद्धा हा गोवंश मोठ्या प्रमाणावर व उत्तम पद्धतीने सांभाळला जात आहे. ह्या गोवंशाला स्थानिक भाषेत वडीहार, वगाड, वगाडीया अशा उपनावांनी देखील संबोधले जाते.

शारीरिक ठेवण

शभरदार छाती, सशक्त भक्कम व मोठी शरीरयष्टी जाडसर व सैलसर कातडी, सर्वात महत्त्वाची अत्यंत देखणी चंद्रकोरी प्रमाणे रेखीव व डौलदार शिंगे, रंग सफेद भूरा ते जांभळट कोसा पर्यंतच्या सर्व छटांमध्ये असतो. एकूण शरीराच्या मानाने चेहरा थोडा लहान असतो पण जबडा रुंद असतो. नाकपुडी संपूर्णपणे काळी व किंचीत उचलल्यासारखी दिसते. कान लांबट अरुंद व शेवटला टोक असलेले असतात. शिंगाच्या मुळाशी जाड केसांचे घट्ट आवरण असते, शिंगे बहुंताशी करड्या रंगाची असतात क्वचीत लालसर गुलाबी छटेची आढळतात. जनावर थोराड व लाबरुंद असते त्यामुळे बैलांमध्ये 'पावलावर पाऊल' कधीच पडत नाही, मागचे चौक रुंद व सरळ तसेच कमी उताराचे असतात, शेपुट उंचीला मध्यम असते पण शेपूटगोंडा काळा व मोठा झुपकेदार असतो, वशिंड एकूण शरीराच्या मानाने फार मोठे नसते. गायींच्या मध्ये कास मोठी व घोळदार असते, चारही सड (आचळ) लांबट मोठे समान अंतरावर असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट नागमोडी व ठळक असतात. चारही खूप मोठे व घट्ट ठेवणीचे असतात. पुर्ण वाढ झालेल्या जनावरांच्या शरिराची मापे साधारणत: पुढील प्रमाणे आकारमान

शरीराची लाबी उंची छातीजवळील घेर

१. बैल १३० ते १३५ सें.मी १४०ते १४५ सें.मी. १७०ते १८० सें.मी. २. गाय २ २. गाय १२० ते १३० से.मी. १२५ ते १३५ सें.मी. १५० ते १६० सें.मी.

पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ५०० ते ५५० कि.ग्रॅ तर गायीचे वजन ३४० ते ३६५ कि.ग्रॅ. पर्यंत असते.

या गोवंशाच्या कालवडीचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणत: ३० ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामध्ये या गायी दिवसाकाठी सर्वसाधारण मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात, सलग २७० ते ३०० दिवस विनातक्रार जेवढे आहे तेवढे दूध देणे ही या गोवंशाची खासीयत आहे. सर्वसाधारणपणे दूधाची फॅट ३.५ ते ४ चे दरम्यान असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २२ महिन्यांचे दरम्यान असते तर संपुर्णत: भाकडकाळ ४ ते ६ महिन्यांचा असतो. जन्मत: वासरांचे अंगावर विविध रंगाच्या छटा असतात पण वासरू जसे ६ ते ७ महिन्यांपेक्षा मोठे होऊ लागते तसा मुळ गोवंशाचा रंग येऊ लागतो. ह्या गोवंशाचे बैल वयाची चार वर्षे पुर्ण झाली की शेतीकामास योग्य होतात. बैल लांब पौंडी असल्यामुळे अंतर कमीतकमी श्रमात व झपाट्याने कापतात. बैल ओढ कामात व शेतीकामात अंगची विलक्षण ताकद सिद्ध करुन दाखवतात. या बैलांमध्ये मारकेपरणा क्वचीत आढळतो, ही जनावरे अत्यंत शांत व सुस्वभावी असतात. एका मालकाकडे उत्तम मेहनतीवर ही बैलजोडी २० ते २२ वर्षे सहज काम करते तसेच गायीची ८ ते १० वेणीसहज होतात. या गोवंशाच्या उत्तम बैलजोडीची किंमत ७५ ते ८० हजाराचे दरम्यान असते तर उत्तम गायीची किंमत २५ ते ३५ हजाराचे दरम्यान असते.

आपल्या सरकारने या गोवंशाचे महत्त्व जाणून पोस्टाचे रु. ३/- चे टपालाचे तिकीट काढले आहे.

ब्राझील देशाने हा गोवंश स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याकडे नेऊन अभ्यासपूर्ण संशोधन करुन उत्तम गुणवत्तेचा परीपूर्ण असा "गुजेरात" नामकरण केलेला गोवंश निर्माण केला. त्याच प्रमाणे अमेरीकेमध्ये सुद्धा या गोवंशावर विशेष संशोधन झाले आहे.

ह्या गोवंशाबद्दल संशोधनात्मक सरकारी पैदास केंद्रे पुढील ठिकाणी कार्यरत आहेत.

1.भुज, जिल्हा कच्छ, राज्य गुजराथ

2.थारा, जिल्हा बसनकंठा, रा. गुजराथ

3. मांडवी, जिल्हा सुरत, राज्य गुजराथ