शहरीकरणाच्या झपाट्यात गावांनाही आता शहर बनण्याचे वेध लागले. शेतशिवार, फळबागा, नगदी पीकांची शेतीपट्ट्यात वाढ होते गावांकडे परंतु पशूधन वेगानं घटत आहे. कोणेएकेकाळी गोधन म्हणजे समृद्धी व संपन्नता मोजण्याचा मानदंड होता. कत्तलखान्यात जाणा-या गाईंची संख्या सातत्यानं वाढते आहे. कोकणातील गोधन भयावह वेगाने संपुष्टात येत आहे. भारतातील काही जाती तर नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. वैविध्यपूर्ण गोवंशाच्या सुमारे २८ ते ३० जाती भारतात आढळतात. आपली ही राष्ट्रीय संपत्ती आहे. गोवंशपालनातून कुटुंबाची आर्थिक प्रगती, उन्नती व त्याच्यासह ग्रामविकास या केंद्रीभूत सूत्रातून महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असलेल्या गोवंशप्रेमी-ग्रामविकास संमेलनाबाबत आणि भारतीय गोवंश-वंशसातत्य याबाबतीत.
भारतीय प्राचीन संस्कृतीत 'गोधन' म्हणजे राजाची श्रीमंती मानली जायची. देशाची मजबूती सोन्याच्या, चांदीच्या साठ्यावर ठरते तशी गोशाळा उत्तम गायींच्या प्रजाती, सशक्त वळू म्हणजे प्राचीन काळात वैभव मानले जायचे. भारतातील गुजरात प्रांतातील 'गीर' गाय जगभरात नेली गेली. ब्राझील, अमेरिका देशाने तर संरीकरणासाठी 'गीर' जात वापरली. सध्या चीनसारखा बलाढ्य देश 'मु-हा' या अत्यंत दुधाळ अशा म्हशीच्या प्रजातीवर अभ्यास संशोधन करत आहे. अशा वातावरणात, भारतीय आयुर्वेद ग्लोबल होत असताना गोवंशप्रेमी-ग्रामविकास संमेलनाचे १६ ते १७ मे रोजी राज्यस्तरावर लांजा, जि. रत्ना्गिरी येथे भव्य आयोजन नवजीवन विकास सेवा संस्था करीत आहे. महाराष्ट्रातील गोवंश अभ्यासक, गोशाळाचालक, आयुर्वेदीय गोवंशाधारीत औषधी उत्पादक गोपालन करणारे राज्यभरातील गोपालक शेतकरी या सर्वांची उपस्थिती या गोवंशप्रेमी-ग्रामविकास समेलनाला असणार आहे.
ग्रामीण भागालाही सध्या शहरीकरणाचा स्पर्श होत आहे. सारवण, रांगोळीचा सडा, जात्यांची घरघर, धारोष्ण दूध या गोष्टी संपतच चालल्या आहेत. मात्र निसर्गसंपन्न कोकणात अजूनही 'गावपण' टीकून आहे. मुबलक पाऊस, कसदार लोह व मॅगनीजयुक्त माती, कष्टाळू, चिवट, काटक काबाडकष्ट करणारा शेतकरी, मोजून मापून असलेला, कर्जाला घाबरणारा शेतकरी व समाज हीच कोकणची संपत्ती आहे. मात्र तरीही लहरी निसर्ग, माकडांचा-वानरांचा उच्छाद, गवारेड्यांचे कळप तर कधी डुक्करांचा उपद्रव ही नैसर्गिक संकटे पाचवीलाच पुजलेली! तरीही आंबाबागायतदार, नारळ, काजू, मसालापीक शेतकरी वाटचाल करतातच. या सर्व वर्गातील शेतक-यांना, कोकणातील शेतक-यांना गोसाक्षरता, गोविज्ञान अभियानातून सजग-सावध करण्याचे काम नवजीवन संस्था करीत आहे. भारतीय गोवंशसंवर्धन अभियान ही नवजीवन विकास सेवा संस्थेची ओळख आहे. या गोपालन आणि गोविज्ञान जाणीव जागृतीचाच राज्यस्तरावर प्रचार-प्रसार व्हावा म्हणून नवजीवनने गोवंशप्रेमी ग्रामविकास समेलनाचे राज्यस्तरीय आयोजन लांजा शहरात त्रिमूर्ती मंगल या सभागृहात १६/१७ मे रोजी केले आहे. अशा प्रकारचा राज्यस्तरावरील हा पहिलाच उपक्रम आहे.
संपूर्ण राज्यभरात अनेक गोवंशप्रेमी गोमाताप्रेमी विविध प्रयोग करीतच असतात. सेंदीय शेतीचे महत्त्व जगातील अनेकांना पटलेले आहे. ऑक्सिटोसीनयुक्त (कुत्रीम पान्हा फोडणारे संप्रेरक) दूध, भेसळयुक्त व रसायनमिश्रीत दूध ही अवघ्या समाजाचीच डोकेदुखी आहे. या दूधभेसळखोरांना फाशीची शिक्षा कधी होईल तेव्हा होवो परंतु आज आम्हाला आम्ही पितो त्या दूधाबाबतीत जागृती हवीय. 'पंचगव्य' हे गायीच्या मूत्रापासून बनवतात, शेतीत फवारणीसह ते पिकांना उपयुक्त आहे. 'गोमूत्र अर्क' या उत्पादनाचे जागतिक पेटंट आहे. जलोदर, हृदयविकार यासारख्या दुखण्यांवर, विकार व व्याधींवर गोवंशाधारित औषधे ही रामबाण उपाय आहेत. गायीचे दूध लहान बाळांसाठी औषधाइतकेच उपयुक्त आहे. गायीचे तूप तर आयुर्वेदतज्ज्ञ, वैद्य सर्वचजण खायला सांगतात. सकाळ-संध्याकाळ अग्निहोत्र करणारे अग्निहोत्र उपासक गोमय म्हणजे गायीचे शेण गोव-या, शेणी करुन वापरतात. सध्या फॅशनच्या, टापटीपीच्या वेडापायी कित्येकजण चौकोनी शेणी, वड्या, साबणाच्या आकारात शेणी, गोव-या वापरतात. या सगळ्याचा परामर्श घेतला किंवा ही यादी वाचली तर एक गाय किती उत्पादने देते ते लक्षात येईल. एका गायीपासून बनवता येणारी ही 'प्रॉडक्ट लीस्ट' एका कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करु शकते.
महाराष्ट्रातील अनेक गोवंशप्रेमी गोपालन आणि सेंद्रीय शेती या माध्यमातून आर्थिकदृष्टया सधन झाले आहेत. श्री. तानाजी निकम या सांगलीतल्या शेतक-याने गिनीज बुकात गोपालनातून सेंद्रीय शेतीचा विक्रम नोंदवला. जळगावच्या शरद पाटील य शेतक-याने एका "लाल कंधारी जातीच्या 'लक्ष्मी' नावाच्या गायीच्या यशस्वी पालनातून आजवर दोन लाख पन्ना हजार रुपये पारितोषिक राज्यभरातून पशूप्रदर्शनातून मिळवले. याच गोपालक शेतक-याला अडीज किलो चांदी बक्षिसात मिळाली शिवाय राजपथावर गायीला घेऊन सन्मानाने चालण्याचाही बहुमान मिळाला. नागपूरातील सुनील मानसिंहकानी गोवंश अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून जगभरातील बाजारपेठेत वस्तूंची विक्री केली आहे. या यशस्वी यशोगाथांसह श्री सुरेश वाघधऱे (सोलापूर), श्री अशोक रानडे (नाटे, ता. राजापूर) श्री. कृष्णाजी राजाराम आष्टेकर ( जि. जालना) यांनी गोवंशपालनातून शेतीत प्रगती साधली आहे. 'नवजीवन' संस्थेला या यशोगाथा कोकणातील शेतक-यांतून घडवायच्या आहेत.
कोकण म्हणजे मागास प्रांत, कोकण म्हणजे मनीऑर्डरकडे डोळे लावून बसलेल्या खेडूतांचा, शेतक-यांचा समाज हा समज कोकणने पार पुसून काढलाय. आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांनी स्वत:ची ओळख बनवलीय कृषी पर्यटनाची पायंडा राज्यभरात चांगलाच रुजतोय. अशा पार्श्वभूमीवर राज्यभरातील गोवंशप्रेमी, प्रयोगवीर कोकणातील लांजा तालुक्यात एकत्र येत आहेत. आपआपल्या बेटांवर, आपल्याच प्रांतातील मर्यादित कार्य वैचारिक आदान-प्रदान करीत सर्वांना सांगितले जाईल. कोकणातील
शेतक-यांना ही सर्व दिग्गज मंडळी गोवंशाधारीत यशाच रहस्य सांगतील. यानिमीत्तानं राज्यभरातील सर्वोत्तम गोवंशाचं प्रदर्शन आयोजित केलं आहे त्यातून प्रेरणा अनेकांना मिळेल. आपणाला नक्की काय करायला हवं आहे याबाबतीत भान येईल. गोठ्याची रचना असो, औषधे असोत वा जनावरांची निवड किंवा उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन या सर्वांची माहिती मिळेल. गोवंशाधारीत बाजारपेठेचा परिचय द्यायला श्री सुनील मानसिंहका यांचेसह श्री. रविंद्र प्रभुदेसाई (पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. ठाणे) उपस्थित असतील. गोरक्षणासह गोवंशपालन, व्यवसाय संवर्धन असा संतुलीत दृष्टीकोन संयोजकाचा आहे.
भारतीय गोवंशसंवर्धन करताना पारंपरिक दृष्टीकोनाला व्यावसायिक दृष्टीकोनाची जोड गरजेची आहे. जगभरात भारतीय आयुर्वेदाला महत्त्व येत असताना 'गाय' या उपयुक्त पशूकडे 'गोमाता' म्हणून पाहण्याऐवजी गोविज्ञान जगाला सांगण्याची, समजावून देण्याची गरज आहे. "गायीच्या पोटी-देव तेहत्तीस कोटी" हे खरं का खोटं यावर वितंडवाद न घालता गोसाक्षरता ही काळाची गरज आहे. गोमूत्र अर्क, गाय शेणाच्या (गोमय) चौकोनी वड्या, शेणी, गोव-या किंवा सेंद्रीय तूप वा दही-ताक विकून ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला चालना मिळत असेल तर 'गाय" पुन्हा वंदनीय ठरेल. सर्व पंथ, विचारवंतांनी गोमाता मानलेल्या गायीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहिले तर "समृद्ध गाय – संपन्न गाव" ही घोषणा ग्रामविकासाची नांदी ठरेल.
भारतीय आयुर्वेद 'ग्लोबल' बनत असताना गोविज्ञानाला नवे व चांगले दिवस येत आहेत. गायीच्या मूत्रापासून बनलेले जाणारे 'गोमूत्र अर्क तसेच 'पंचगव्य' यातील औषधी गुणधर्म आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहेत. गायीला 'उपयुक्त पशू' मानणे किंवा 'गोमाता" मानणे हे झाले दोन टोकांचे दोन दृष्टीकोन! व्यवहारवादी, व्यापारी युगात गोसाक्षरतेच्या चळवळीतून आधुनिक, सुशिक्षित व सुसंस्कृत समाजाला गोविज्ञान समजावून देण्याची गरज आहे. शहरीकरणाच्या विळख्यात आणि अर्धवट सुधारणा घडणा-या नवशहरी लाटेत ग्रामीण विकासासाठी 'गाय' जर तारक ठरत असेल तर 'समृद्ध गाय – संपन्न गाव' ही पर्यावरणपूरक गावासाठी नवी विकासनांदी ठरावी. यासाठीच राजापूर तालुक्याती नवजीवन विकास सेवा संस्थेने विविध गोवंशप्रेमी, गोपालक, गोशाळाचालक, आयुर्वेदीय गोवंशाधारीत उत्पादक यांचे गोवंशप्रेमी ग्रामविकास संमेलन १६ ते १७ मे रोजी आयोजित केले आहे. गोपालनातून कौटुंबिक आर्थिक विकास आणि पर्यायाने ग्रामविकास या सूत्रावर आधारीत या संमेलनासाठी आदर्शगाव हिरवेगाव बाजार ( जि. अहमदनगर) येथील सरपंच श्री. पोपटराव पवार आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. प्रसाद देवधर यांचे प्रमुख मार्गदर्शन या ग्रामविकास परिषदेत होणार आहे.
महाराष्ट्र राज्याने दुग्धव्यवसायात कायमच आघाडी राखली आहे. यातील कोकणाचा वाटा जवळजवळ नसल्यासारखाच आहे. दुधासाठी कोकण भाग पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असतो पण भाजीपाल्याबाबतही तशीच अवस्था आहे. सध्याच्या कोकणप्रांतात धरणांनी पाण्याचा प्रश्न ब-यापैकी, समाधानकारकतेनं सोडवला आहे. कै. पु.ल.देशपांडेच्या 'अंतू बर्वा' या गृहस्थाला व्यक्तिमत्त्वाला दिसणारं कोकण व रत्नागिरी आता खूप खूप बदललीय. काळाकुट्ट कोरा चहा आणि समस्त, सर्व गाथण म्हशी सोडाच, परंतु राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातून अणुस्कूरा घाटमार्गे कोल्हापूरला तब्बल नऊशे ते साडेनऊशे लीटर दूध भर तापत्या, तळपत्या उन्हाळ्याच्या दिवसात जात आहे हा बदल नोंद घेण्यासारखा आहे. पूर्णत्त्वाला चाललेलं अर्जुना धरण राजापूर-लांजा तालुक्याला सुजलाय-सुफलाम करू शकते. येणा-या प्रत्येक नव्या बदलाला विरोधच करण्यापेक्षा संधी शोधणा-या आशावादी शेतकरी व शिक्षकांच्या स्वयंसेवी संस्थेने गोवंशप्रेमी-ग्रामविकास संमेलन हे नवे दालन खुले करण्यासाठी आयोजिले आहे.
गोधन प्राचीन काळापासून अर्थकारणात निर्णायक ठरत आलेले आहे. राजांची श्रीमंती गोधनावर ठरत असे. लग्न असो वा बारसे वा मोठा राज्यभिषेक तेव्हा 'गोदान' केले जात असे. कृषीविकासाची चळवळ गोवंश-पालनाची निगडीत होती. वेदपाठशाळा, ऋषींचे आश्रम आदी सामूहिक आणि सामाजिक संस्थांकडे गोशाळा असत. या सर्वांची आठवण अशासाठी येते की आज हे संदर्भ नव्या पद्धतीनं ग्रामीण विकासासाठी आचरणात आणायला हवेत. कोकणातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाची पुनमांडणी करायला हवी आहे. रत्नाहगिरी-सिंधुदुर्गात फलोद्यान व पर्यटन या दोन प्रमुख घटकांना केन्द्रस्थानी ठेवून गोवंशसंवर्धनाचा प्रयोग करावा लागणार आहे. कोकणातील शेतकरी काटक व चिवट आहे. काळ्याकथिन्न कातळावरही अन् जांभ्या दगडाच्या सड्यावरही आंबा बागा उभ्या राहत आहेत. आंबा, नारळ, काजू या पिकांशिवाय नवनवे पर्याय शोधायला हवेत हे शेतक-यांना पटू लागलं आहे. माकड, वानर, डुक्कर गवारेडे, हत्ती यांच्या उपद्रवाची टांगीत तलवार कुठे ना कुठे आहेच आहे. परंतु सामूहिक केळीलागवड, कलिंगड, कुळीथ-पावटा-मूग यासह झेंडू व फुलशेती, आले-हळद यासह अन्नस-पपई-बांबू व वनौषधी प्रकल्प कोकणची ओळख बनत आहेत.
शेतक-यांकडून प्रगत आणि नगदी पीकांच्या शेतीला प्राधान्य दिले जात असतानाच कोकणात कृषी पर्यटन केंद्रांची संकल्पना चांगलीच रुजत आहे. गणेश आम्रपर्यटन केंद्र ( नाटे), मामाचा गाव ( देवरुख-गुहागर) गारवा असा कृषी पर्यटनातून कोकण कात टाकत आहे. बदलत्या गावांत नवे वारे वाहतानाच नवजीवन विकास सेवा संस्थेने गतवर्षी शेतकरी गौरव-शेतकरी सन्मान' कार्यक्रमात 'गीर गाय' या विषयावर प्रबोधन घडवले. अवघ्या वर्षभरातच तब्बल ५ कार्यशाळा झाल्या. गोवंशपालन ही नवी दिशा आंबाबागायतदारांसह सर्वांनाच आपलीशी वाटायला लागली. संस्थेने मांडलेली भूमिका, गोपालन वर्गातील प्रशिक्षण यातून महाराष्ट्रभर 'गीर गाय' य जातीबद्दल विविध अंगाने चर्चा झाली. भारतीय वंशाची देशी गाय, संकरीत गाय असे कंगोरेही चर्चेला आले; पण 'गोधन' याबाबतीत उलटपालट साधकबाधक चर्चा झाली.
या चर्चेच्या माध्यमातूनच राज्यस्तरीय गोवंशप्रेमी-ग्रामविकास संमेलनाची संकल्पना राज्यभरातून पुढे आली. अनेक गोधनप्रेमींनी तसा आग्रह धऱला. राज्यातील निवडक गोशाळाचालक, गोविज्ञान अभ्यासक, गायी पाळणारे छोटे मोठे शेतकरी, पशूधनाचा चिकित्सक अभ्यास करणारे या सर्वांना 'गोवंशप्रेमी-ग्रामविकास' संमेलनात मुक्त सहभाग आहे. पशूवैद्यक आणि गोवंशाधारित उत्पादने बनविणा-या उत्पादकांना विशेष निमंत्रण आहे. या संमेलनात गोवंशप्रेमींसह कोकणातील प्रगतीशील व होतकरू शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी संयोजकाचा प्रयत्ने आहे. विचारांचे आदानप्रदान, परस्परांच्या प्रयोगांची माहिती, समस्यांची जाणीव या एकत्रीकरणातून येईल. सध्या गोवंशाधारित प्रयोग करणारे अनेक गोमाताप्रेमी आपआपल्या बेटांवर प्रयोगमग्न असतात. गायीची समाधी बांधणारेही आहेत व गायीच्या नैसर्गिक मृत्यूनंतर दफन करून 'समाधीखत' करणारेही आहेत गरज आहे या सर्व प्रयोगवीरांनी, गोमाताप्रेमी प्रयोगकर्त्या गोविज्ञानप्रेमी, गोसाक्षरताप्रेमी क्रियाशिल गोपालकांनी एकासूत्रात एकच येण्याची. नवजीवन संस्थेने त्यासाठी एका संकेतस्थळाची http://www.godaan.in निर्मिती केली आहे. कोणतीही चळवळ लोकसहभागातून, लोकांच्या गरजांतून व लोकांच्या दैनंदिन शेतातच उभी राहायला हवी हे यशस्वी अभियानाचे मूलत्त्व असते. भारतीय गोवंशसंवर्धन अभियानात हे संमेलन-परिषद दृष्टीकोन घडविल असा विश्वास आहे.
गाय म्हणजे 'गोमाता' किंवा गाय म्हणजे उपयुक्त पशू हे दोन्ही दृष्टीकोन दोन टोकाचे झाले. कोणतीही झापडबंद विचारसरणी घेऊन चालणार नाही. गायीपासूनच्या उत्पादनांची स्वतंत्र बाजारपेठच सध्या बनली आहे. गरज आहे ती सामान्यातल्या सामान्य शेतकरी बांधवांना, बचतगटांना, स्वतंत्र महिलांना जाणीव देण्याची, माहिती देण्याची, सामान्य शेतक-याला हे बदल माहित असायला हवेत. संकराबाबतही आंधळे धोरण चालणार नाही. अतिपावसात तग धरणारी केरळची 'वेच्चूर' गाय असेल तर त्याच वळूच्या कृत्रीम वीर्यकांड्या संकर करण्यासाठी हव्यात. सध्या वंशसातत्य महत्त्वाचे मानले जाते त्याचेही प्रयोग सर्वांना समजले पाहिजेत. गीर, गवकाऊ, लाल कंधारी, डांगी, खिलार, साहिवाल, देवणी या जातींच्या गायींच्या पालकांचे संघ आहेत, गट आहेत त्यांचे पत्रे, नंबर्स परस्परांना दिले घेतले पाहिजेत. सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेऊन दुग्धव्यवसाय, गोवंशपालन पुढे नेणा-या भारतीय गोवंशसंवर्धन चळवळीत हे संमेलन महत्त्वाचा पायंडा आहे.
नवजीवन विकास सेवा संस्थेची ही चळवळ गोपालकांना गरीबीतून श्रीमंतीकडे नेणारी आहे. महात्मा गांधी भारतीय गायीला आशावादी प्राणी मानत. शेळीला ते गरीबांची गाय मानत. मात्र गोवंश आधारीत उत्पनांतून गरीबांची आर्थिक उन्नती साधणारी चळवळ ज्या प्रमाणात व्हायला हवी तशी झाली नाही. जागतिक बनलेल्या आयुर्वेदानं गोवंशासाठी संधीचे दार उघडले आहे. मरतुकडी, हाडे मोजता येतील अशी, फक्त गोमूत्र व देवघर सारवण्यासाठी शेणच देणारी स्वत:च्या दाव्याचा व झाडूचाही खर्च निव्वळ नफा म्हमून न देणारी तांबू-कपिला गाय बाळगायची का श्री. शरद पाटलांसारखी गाय पाळून लाखो रुपये कमवायचे हा प्रश्न प्रत्येक गोपालकाने स्वत:ला विचारावा. कौटुंबिक आर्थिक विकासाह ग्रामविकास हे सूत्र नव्या कृषीआधारीत व्यवस्थेत हवेच. श्री. पोपटराव पवार (आदर्शगाव सरपंच-हिरवेगाव बाजार जि. अहमदनगर) श्री. प्रसाद देवधर (कुडाळ भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान) यांचे प्रमुख मार्गदर्शन आहेच. गोवंशाची चळवळ, पालन ग्रामविकासाह पुढे जाईल हे निश्चितच!