"लाल कंधारी" गोवंश (मराठवाडा)

मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणा-या दुष्काळात तसेच तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरुन राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा तसेच राष्ट्रीय स्तरांवरील पशुप्रदर्शनांमध्ये अग्र मानांकने मिळवणारा गोवंश म्हणून फक्त "लालकंधारी" गोवंशाचीच ओळख आहे. शेतीमधील कामे नेटाने व चपळाईने करणे यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे;तसेच या बैलांची उभे राहण्याची ढब व चालण्यामधील नजाकत व अंगावरील चमक कोणत्याही शेतक-याला या गोवंशाच्या प्रेमात पाडते.

गोवंशाची उपलब्धता

आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, नांदेड, बिलोली आणि नायगाव या तालुक्यांमध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ औसा, उद्गीर आणि बीड जिल्ह्यामधील परळी व हिंगोली या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हौसेने या गोवंशाची पैदास करतात व विक्री देखील करतात.

शारीरिक ठेवण

या गोवंशाच्या गायी मध्यम आकारामानाच्या व आटोपशीर असतात. या गायीचा रंग किंचीत लालसर फिकटसर छटा ते लालसर गडद छटा यांमधील विविध छटांमध्ये असतो. या गायींमध्ये अन्य कोणत्याही रंगाचा ठिपका किंवा पट्टा नसतो. या गायींचे मस्तक कानाच्या वरच्या बाजूला किंचीत आत गेलेले व मध्यभागी फुगीर असते, शिंगे कधीही कोचर नसतात बाहेरच्या बाजूला निघालेली फुगीर काळी किंवा लालसर काळी असतात, कान पसरट आखूड व टोकाला गोलाकार असतात तसेच जमिनीला समांतर असतात. नाकपुडी संपुर्णत: काळी, जबडा चेह-याच्या मानाने किंचीत रुंद असतो, डोळे टपोरे तेजस्वी काळेभोर व अत्यंत बोलके असतात, डोळ्या भोवती काळ्या रंगाचे आकर्षक वर्तुळ असते. पाय शरीराच्या मानाने उंच व भक्कम असतात, खूर काळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे परंतु जरा विलग असतात, पाठ सपाट व मागील चौक उताराचे असतात, या गायींची कास आटोपशीर आणि शरीराबाहेर किंचीत दिसणारी असते. चारही सड (आचळ) लहानसर व गुलाबी असतात, बहुतेक गायी व मेणकासी असतात. शेपूट लांबलचक मागच्या नखीपर्यंत पोचणारी असते, शेपूट गोंडा काळा असतो, या बेलांचे वशिंड गडद कालसर छटेचे देखणे व भरदार असते.

पूर्ण वाढ झालेल्या बहलाचे वजन ४०० ते ४५० कि.ग्रॅ पर्यंत तर गायीचे वजन ३०० ते ३५० कि.ग्रॅ. पर्यंत असू शकते.

पूर्ण वाढ झालेल्या गोवंशाची साधारणत: मापे

शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर

१. बैल ११० ते १२० १५०

२. गाय १३० त १४० १७०

या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर कालावधी फक्त ८ ते १० तासांचा असतो त्यामुळे माज लक्षात येताच त्वरीत संकर घडवून आणावा. ऐन दूध देण्याच्या भरामध्ये दिवसाकाठी ४ ते ५ लिटर लूध सहज देतात, परंतु सलग दूध देण्याचा कालावधी १० ते १२ महिन्यापर्यंतचा आहे. नवजात वारसाचे वजन १२ ते १५ कि.ग्रॅ. असते पण या वासरांचा वाढीचा वेग विलक्षण असतो. दुधातील स्निग्धतेचे प्रमाण ३.५० ते ४.०० पर्यंत असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २० महिन्यापर्यंत असते व संपूर्णत: भाकड कालावधी १२० ते १८० दिवसापर्यंत असू शकतो.

या जातीचे बैल ओढकाम, शेतीकाम व शर्यतीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. खिलारी गोवंशा खालोखाल या बैलांमध्ये चपळाई असते. या गायी एकाजागी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यावर १० ते १२ वेणी सहज देतात तसेच १८ ते २० वर्षे बैल उत्तम पद्धतीने काम करतात ह्या गोवंशांमध्ये मारेकपण सहसा नसतो. आपल्या मराठवाड्यातील मु.पो. मावलगाव येथील प्रगतीशील शेतकरी व निष्ठावान गोसेवक श्री. शरद पाटील ह्यांना ह्या गोवंशाचे संवरधना बद्दल केंद्र शासनाचा "बाबू जगजीवन राम किसान" पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ह्या जातीच्या उत्तम बैलजोडीची किंमत रु. १.५० लाखापर्यंत तर उत्तम गायीची किंमत ३५ ते ४० हजारापर्यंत आहे.

कंधारी बैलजोडी दारात असणे ही मराठवाड्यामधील शेतक-याचे दृष्टीने भूषणाची गोष्ट आहे.